Breaking News

गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर अन्नत्याग उपोषण मागे, कॅबिनेट बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षकांना आश्वासन

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आदिवासी विकास कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षण कृती समितीच्या वतीने नाशिक येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. तर आपल्या मागणी संदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतलाय. काल यातील दोन आंदोलकांची प्रकृती प्रचंड खालावली होती. परिणामी, भाजप आमदार सीमा हिरे यांनी या आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या आणि म्हणणे जाणून घेतले होते.

सोबतच आंदोलकांना रुग्णालयात उपचार घेण्याचेही आवाहन केली होते, मात्र, मागणी संदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून उपचार घेण्यास ही या आंदोलकांना नकार दिलाय. त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलकांची भेट घेतलीय. मंत्री महाजनांच्या मध्यस्थीनंतर अखेर या आंदोलकांनी आपले अन्नत्याग उपोषण मागे घेतेले आहे. कॅबिनेट बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षकांना आश्वासन दिल्यानंतर या आंदोलकांनी हा पवित्रा घेतला आहे.

नाशकात आदिवासी विकास कंत्राटी शिक्षण कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण पुकारले होते. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आणि उपचारही घेणार नसल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन स्थळी जात या आंदोलकांची भेट घेतली आणि आंदोलकांशी चर्चा केली. या भेटी दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.

या बाबत माहिती देताना आपण स्वत: या विषयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्याना दिली. सोबतच आदिवासी मंत्री विजकुमार गावित यांनाही बैठकीत बोलवून हा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी असल्याचे आश्वासनही मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, आपण उपोषण सोडले पाहिजे, अशी विनंतीही मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्याना केली असता, त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. कॅबिनेट बैठकीत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. त्यानुसार संगणक शिक्षण कृती समितीने त्यांचे अन्नत्याग उपोषण मागे घेतले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. त्यामुळे आगामी काळात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा या आंदोलकांनी बोलताना व्यक्त केली आहे. यावेळी आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकलेही मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आंदोलकांच्या भेटीसाठी उपस्थीत होते.