Breaking News

मोठी बातमी! अजित पवार यांच्याकडून नवाब मलिक यांच्या कन्येवर मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या मतदारसंघात पोहोचली. यावेळी नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या यात्रेचं स्वागत केलं. तसेच अजित पवार आणि नवाब मलिक आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमात उघडपणे एकाच मंचावर बसलेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोकाचा विरोध आहे. असं असताना अजित पवार आणि नवाब मलिक यांनी आज एकाच गाडीने प्रवास केला तसेच एकाच मंचावर हे दोन्ही नेते एकत्र आले. हेही असे की थोडे, अजित पवार यांनी आज नवाब मलिक यांच्या कन्या सना नवाब मलिक यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी घोषित केली.

“सना नवाब मलिक यांना आमच्या पक्षाची प्रवक्ता म्हणून घोषित करत आहोत”, अशी मोठी घोषणा अजित पवारांनी केली. “महिलांना आणि तरुणांना संधी द्यायची आहे म्हणून आम्ही सना नवाब मलिक यांना प्रवक्ता म्हणून घोषित करत आहोत. सना मलिक यांचे इंग्लिश, हिंदी चांगले आहे, तसेच मराठी पण चांगलं होईल. सना मलिक यांना कसलीही गरज लागली तर अगदी रात्री 12 वाजता सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत”, असं अजित पवार म्हणाले.

“विरोधकांनीही अल्पसंख्यांकांबाबत अनेक खोट्या गोष्टी बोलल्या. कुठेतरी सीएए, एनआरसीबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. पण ते फक्त त्या भारतीयांसाठी होते जे परदेशात समस्यांना तोंड देत आहेत. ज्या भूमीवर आम्ही पार्टी बनवली त्याच जमिनीवर आम्ही अल्पसंख्याकांसाठी पार्टी केली. वक्फ बोर्डाच्या बाबतीत अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि हे फक्त अल्पसंख्याकांचे नाही, कोणत्याही समाजावर अन्याय होत असला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही”, अशीदेखील मोठी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.