आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासह विविध मुद्यांवर खलबतं सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवारांबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘मागितले असते, तर सर्व काही दिले असते, पण पक्ष बळकावण्याची गरज नव्हती,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘आम्हाला अजित पवारांना पक्षात ठेवायचे होते, पण त्यांनी आमचे आयुष्य विस्कळीत करुन सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक आमदारांना सोबत घेऊन त्यांनी पक्ष फोडला. त्यांनी मागितले असते, तर सर्व काही देऊन टाकले असते, पण पक्ष बळकावण्याची गरज नव्हती,’ असे सुप्रिया यावेळी म्हणाल्या.

अजित पवारांना बाजूला सारून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचे नेतृत्व करायचे होते, असा आरोप केला जातो. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्यात मला आनंदच झाला असता. मी कधीही पक्षाचे नेतृत्व करण्याची मागणी केली नाही. अजित पवारच यासाठी प्रयत्न करत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, याच कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्री बनायचे आहे. पण आमची गाडी तिथेच अडकते, त्याला काय करणार. पुढे जाता यावे, यासाठी मी प्रयत्न करतो, मात्र संधी मिळत नाही. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला संधी चालून आली होती, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने ती गमावली. प्रयत्न करणे प्रत्येकाचे काम आहे. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची एकच जागा आहे आणि जो 145 आमदाराचं समर्थन मिळवेल, तो मुख्यमंत्री बनेल. माझी महत्त्वाकांक्षा काय आहे हे मी आता सांगणार नाही. सध्यातरी आमचे लक्ष्य महायुतीच्या रूपात पुन्हा सत्तेत येणे हेच आहे, असे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.