हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने पण मुसंडी मारली आहे. एकूणच हरियाणात काँटे की टक्कर दिसत आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, भूपिंदर सिंह हुड्डा, रणजीत सिंह चौधरी, दुष्यंत चौटला, विनेश फोगाट यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला आज होणार आहे. हरियाणामध्ये गेल्या दहा वर्षात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप हॅटट्रिक मारणार की काँग्रेस जोर का झटका देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. “हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचेच सरकार येईल याची मला खात्री आहे”, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हरियाणा-जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. हरियाणाचा निकाल हा शेवटपर्यंत पुढे-मागे होत असतो. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, तिथे तर हे चालूच राहणार आहेत. कालच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी म्हटलं होतं की मी जिंकण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे, मग त्यांनी काय व्यवस्था केली हे पाहावं लागलं, असे संजय राऊत म्हणाले.
हरियाणात मोदींच्या भाजपच्या विरोधात लाट आहे. त्या ठिकाणची जनता यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही. निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. हरियाणामध्ये काँग्रेस सरकार बनवेल, याची मला खात्री आहे. जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस आघाडीसह सरकार बनवले. ही दोन्हीही राज्य खूप महत्त्वाची आहेत. कलम ३७० बद्दल मोठमोठ्या गोष्टी करत होते. अनेक विषयांवरही बोलत होते. पण जम्मू काश्मीरच्या जनतेने मोदी, अमित शाह आणि भाजपला राज्यातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.
तुम्ही देशातील कोणत्याही राज्यात कुठेही निवडणुका घ्या, पण त्या ठिकाणी भाजप, मोदी-शाहा यांच्या पक्षाचा निश्चितच पराभव होईल. तुम्ही उत्तरप्रदेशात किंवा गुजरातमध्ये निवडणुका घ्या. मोदींचा एक कृत्रिम जलवा होता, तो आता संपला आहे. त्यांचा मुखवटा उतरला आहे. हरियाणासोबत जर महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या असत्या तर भाजपचा निश्चितच पराभव झाला असता. आता महाराष्ट्रात निवडणुका होतील. त्यात आम्हाला महाविकासाआघाडीला मिळून १७५ ते १८० जागा मिळतील. भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निश्चितच हरणार आहे. हरियाणामध्ये काँग्रेसचेच सरकार येईल, याची मला खात्री आहे, असेही संजय राऊत म्हणाले.