kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महायुतीला बसला मोठा धक्का ! महादेव जानकर यांनी सोडली साथ ; बघ नेमकं प्रकरण काय

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यात राजकीय वारे बदलताना दिसून येत आहेत. अशातच, राज्यातील महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. २०१४ पासून ते युतीसोबत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदही देण्यात आलं होतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, तिथं त्यांचा पराभव झाला.

जानकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारात घेतलं जात नाही अशी त्यांची तक्रार होती. महायुतीच्या नेत्यांनी या तक्रारीकडं दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्या नाराजीत भर पडली. अखेर त्यांनी वेगळी वाट धरली आहे. आगामी निवडणुकीत सर्व जागा लढण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवल आहे.

काय म्हणाले महादेव जानकर?

‘कोणावरही नाराज असण्याचा प्रश्न नाही. आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. लोकसभेला आम्हाला एक जागा देण्यात आली होती. पण आम्हाला विधानसभेत मोठं यश मिळवायचं आहे. भाजप व काँग्रेसच्या तोडीचा पक्ष आम्हाला व्हायचं आहे. विधानसभेतील २८८ मतदारसंघांतून आमच्या पक्षातून निवडणूक लढण्यासाठी दोन-दोन, तीन-तीन अर्ज आले आहेत. त्यामुळं आमची ताकद आजमावून बघण्यासाठी आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असं जानकर यांनी स्पष्ट केलं.