दादरमधील शिवाजी पार्क परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मनसेकडून संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात रोषणाई केली जाते. या दीपोत्सावाचा शुभारंभ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सिंघम-3च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. राज ठाकरे यांच्यासह रोहित शेट्टी, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि अर्जून कपूर हे कलाकार उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी सिनेमाला शुभेच्छा देताना म्हटलं की, “तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आज दिवाळीचा पहिला दिवस आणि 1 तारखेला सिनेमा येतोय. त्या सिनेमाविषयी तुम्हाला सांगायची गरज नाही. आज अजय देवगण, आपल्यासमोर एक सिंह आलेलाच आहे. रोहित शेट्टी यांचा सिनेमा म्हटल्यावर तो मराठमोळाच सिनेमा असतो हे आपल्याला माहितेय. या शिवाजी पार्कच्या मराठमोळ्या वातावरणामध्ये सिंघमची सगळी टीम इकडे यावी अशी माझी मनापासून इच्छा होती. ते सगळेजण इथे आले यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. “
रोहित शेट्टीने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “माझा सिनेमा मराठीच असतो फक्त त्यात कलाकार हिंदी असतात.. सिंघमवर तुम्ही भरभरुन प्रेम केलंय. आता त्याचा तिसरा भागही येतोय त्यावरही भरभरुन प्रेम करा…”
अर्जुन कपूरने म्हटलं की, “तुमच्या सगळ्यांसाठी हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन तो पहा. राज साहेब खूप आभार तुम्ही आम्हाला इथे बोलावलंत. मराठी बोलायचा विचार करुन आलो होतो पण शब्दच सुचत नाहीयेत. पण पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की मराठीतच बोलेन.. तोपर्यंत जय महाराष्ट्र..”