Breaking News

‘त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पहिल्यांदा पाणी पाहिले’ ; अमित ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण आणि..

मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. अमित ठाकरे यांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैयक्तिक संबंध आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “आमचे वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत काहीच संबंध नाहीत. मी आदित्यला खूप लहानपणी भेटायचो. लहान म्हणजे मी त्यावेळी केवळ सात ते आठ वर्षांचा असेल. त्यावेळी मी ‘मातोश्री’वर जायचो. फिल्म वगैरे बघायचो. त्यानंतर राज ठाकरे यांचं शिवसेनेतून बाहेर पडणं चालू झालं, मला तेव्हा राजकारण समजायचं नाही. मी लिफ्टमधून खाली आलेलो आणि वडील राज ठाकरे नुकतंच मातोश्री येथून जाऊन आले होते तेव्हा मी त्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदा पाणी बघितलं होतं. तेव्हा मला कुठेतरी विषय गंभीर आहे, असं वाटलं”, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.

“मी तेव्हा पहिल्यांदा माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी बघितलं. ते आत गेले. तसं म्हणजे ढसाढसा रडत नव्हते, पण डोळ्यांत पाणी बघितलं. म्हणून मला कुठेतरी वाटलेलं की, लांब राहिलेलं चांगलं. पण त्यावेळेला माहिती नव्हतं की, काय चालू आहे. अनेक शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिकांकडून ऐकलं की, काय-काय गोष्टी झाल्या. पण चालून गेलं. 2014 मध्ये प्रयत्न झाले, दोन भाऊ एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले. मला माहिती नाही ते खरं आहे का? पण 2017 मध्ये बघितलं की, खरे लोकं कशी आहेत, तेव्हा मला कुठेतरी वाटलं की, लांब राहिलेलं चांगलंच. ते समोर आल्यावर मी हाय वगैरे म्हणेन. पण असा काही संवाद नाही”, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.

“आम्ही परिवाराबद्दल अजूनही ते पथ्य पाळतो. नातं म्हणून अजूनही ते पथ्य पाळतो. कुठेतरी मलाही वाटतं की, आदित्य ठाकरे त्यामध्ये सहभागी नसेल. नाती म्हणून ते पथ्य पाळतो. आदित्य मर्डर वगैरेच्या लेव्हलला जाईल, असं मला वाटत नाही. हे माझं मत आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले.

अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावंडांनी एकत्र यावे असं कधी वाटलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हो, वाटलं. 2014 मध्ये आपल्याला तसं वाटलं होतं. पण मी 2017 मध्ये गंभीर आजारी असताना 6 नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी फोडले होते. त्यामुळे ती घटना बघून मी त्याबाबतचे दरवाजे बंद केले”, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.