बॉलिवूड अभिनेता आणि महायुतीचा स्टार प्रचारक गोविंदाची जळगावमध्ये प्रचारादरम्यान तब्येत बिघडल्याने तो ताबडतोब हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो महायुतीचा प्रचार करत आहे. मात्र, आज जळगावात प्रचारदरम्यान छातीत दुखू लागल्याने त्याला प्रचार अर्धवट सोडावा लागला.
शनिवारी गोविंदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होता. त्याने मुक्ताईनगर, बोडवड, चोपडा आणि पाचोरा या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. मात्र, पाचोरा येथे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांचा प्रचार करताना अचानक गोविंदाचा गोळी लागलेला पाय दुखू लागला आणि त्याला अस्वस्थ जाणवू लागले. यानंतर गोविंदाने प्रचार थांबवला. मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्याने नागरिकांना नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याचे आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
किशोर पाटील यांचा प्रचार करताना गोविंदा म्हणाला की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील किशोर पाटील यांच्यासोबत आहेत, जे देशाच्या प्रगतीसोबत आहेत. किशोर पाटील विजयी व्हावे, अशी प्रार्थना करतो. जनतेने मला भरभरून प्रेम दिले. परंतु, माझ्या छातीत दुखत आहे.मला कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे मी आता हा दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत जात आहे. मी इथल्या लोकांची माफी मागतो. ‘
‘महाराष्ट्रात महायुती नक्की जिंकेल. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहेत. मला महाराष्ट्राच्या भूमीचे वरदान लाभले. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे संपूर्ण जग महाराष्ट्राकडे पाहू लागले. नक्कीच राज्याची प्रगती होत आहे. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे’, असेही गोविंदा म्हणाला.