Breaking News

‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एक महत्त्वाची गोष्ट बोलले

“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी चालवायला रस्ते मिळत नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील मुलं शहरात येतात. मुंबई-पुण्यातील मुलं परदेशात जाण्याचा विचार करतात. अनेक विषय आहेत, ज्याची सोडवणूक झालेली नाही” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते लालबाग मेघवाडी येथे शेवटच्या प्रचारसभेत बोलत होते. “त्या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा वळावं यासाठी काही गोष्टींची सोय केली. महाराष्ट्र हा हिंदुत्वाने भारावलेला महाराष्ट्र. पण हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्रात हे हिंदुत्व तोडण्याचं काम शरद पवारांनी केलं” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

“जाती-जातींमध्ये भेद निर्माण केले. अनेक सभामधून सांगितलं, शिवसेना, मनसे, काँग्रेस, एनसीपी, भाजप हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे राजकारण चालतं, तसं महाराष्ट्रात होऊ नये. अत्यंत भीषण घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर हे सर्व सुरु झालं” असं राज ठाकरे म्हणाले. “महाराष्ट्राला संतांनी एकोप्याची शिकवण दिली. यांच्या स्वार्थी राजकारणासाठी आपण सगळं विसरतोय का?” असं राज ठाकरे म्हणाले.

“2019 च्या निवडणुकीचा विचार करुन बघा. शिवडी मतदारसंघात तुम्ही मागच्यावेळेला शिवसेना-भाजपला मतदान केलं. निकाल लागल्यानंतर शिवसेना उठली आणि ज्यांच्याविरोधात निवडणुका लढवल्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्यासोबत जाऊन बसली. तुम्हाला कोणी विचारलं का? हा तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही का वाटतं? काँग्रेस-राष्ट्रवादी नको, म्हणून तुम्ही युतीला मतदान केलं होतं ना. निकालानंतर एक पक्ष उठतो आणि ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांच्यासोबत जाऊन बसतो, हे कोणतं राजकारण आहे?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला. “मी आजपर्यंत देशाच्या राजकारणात अशी गोष्ट बघितली नाही. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, निकलानंतर त्यांच्यासोबत जाऊन बसले” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

“या सगळ्या गोष्टी तुम्हाला जातीमध्ये विसरायला लावतायत. आज आम्ही आमच्या महापुरुषांना जातीमध्ये वाटून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे. काही लोक अशा दृष्टीन बघायला लावत आहेत. जात प्रिय असणं मी समजू शकतो. पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायचा. महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे. आपण प्रत्येकाने महाराष्ट्र सुधारला पाहिजे. निवडणुका येतात-जातात, हा पडेल, तो पडेल, चालू राहतं. पण एकदा राज्याच व्याकरण बिघडलं, तर सुधारता येणार नाही. मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय” असं राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *