Breaking News

…… आणि ते पुन्हा आले !

‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा’, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ लागतातच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या भाषणातील या ओळी आता अनेकांना आठवत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपने नव्याने पक्ष उभारणीसाठी काम केलं. प्रचार केला, ग्राऊंड लेव्हलला काम केलं, लोकांपर्यंत पोहोचले, त्याचाच फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम येथून देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. तर, भाजपने एकट्याने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय अत्यंत मोठा मानला जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हा भाजपाचा मुख्य चेहरा होता. हा चेहरा मतदारांना पसंत पडला. हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झालंय. फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपानं बहुतेकांचे अंदाज धुळीला मिळवत 100 पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत.

महायुती सरकारच्या काळात मुंबई तसंच महाराष्ट्रात झालेले पायाभूत प्रकल्प, मुंबईत वाढलेलं मेट्रोचं जाळं, राज्यातील परकीय गुंतवणूक, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, वाढवण बंदरामुळे होणारा राज्याला आणि देशाला फायदा हे सर्व मुद्दे फडणवीसांनी भाषणातून सातत्यानं मांडले. त्यांचे मुद्दे राज्यातील मतदारांना, विशेषत: शहरी मतदारांना भावल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. ‘व्होट जिहाद’ ला ‘धर्मयुद्ध’ नं उत्तर द्या, हे आवाहन मतदारांना केलं. फडणवीसांच्या या प्रचारामुळे लोकसभेत निष्क्रीय राहिलेला भाजपाचा पारंपारिक मतदारांमध्ये उत्साह संचारला. ते पुन्हा सर्वशक्तीनीशी प्रचारात उतरले. त्याचबरोबर नवमतदारही भाजपाकडे आकर्षित झाले. त्याचा फायदा भाजपाला झाला. भाजपाला हा फायदा मिळवून देण्यात फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली.

भाजपानं विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांच्या मदतीनं निवडणूक लढवली. जागा वाटपाचा प्रश्न सोडवण्यात फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरली. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. अगदी निवडणुकीच्या दिवशी सुशील कुमार शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्यानं सहकारी पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेतली. महायुतीमध्ये हे प्रकार कमी करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा होता. त्याचा भाजपासह महायुतीलाही फायदा झाला.

मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे देवेंद्र फडणवीसांच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा मानलं जात होतं. त्या आंदोलनाचा फटका लोकसभेत भाजपाला बसला. पण, विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरवर मात करण्यासाठी भाजपाची रणनीती यशस्वी झाली. जरांगे फॅक्टरवर मात करणारी रणनीती आखण्यात फडणवीस आघाडीवर होते. भाजपाचं आक्रमक हिंदुत्व आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा निर्णायक ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *