महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला मिळालेल्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी आणि गुरदीप सप्पल हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता इंडिया आघाडी EVM च्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात (SC) जाणार असल्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे.
शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी काल रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांविरोधात इंडिया आघाडी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या ऐन तीन दिवस आधीपर्यंत मतदारांची नावं जोडली आणि हटवली गेली. आम्ही जो दावा करत याचिका करणार आहोत, त्याच्याशी संबंधीत डेटा आमच्याकडे आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसाठी असणाऱ्या एसओपीजचं पालन करण्यात आलं नाही.
प्रशांत जगताप पुढे बोलताना म्हणाले, ‘भाजप नेत्यांच्या अर्जाच्या आधारे दिल्लीतील एका मतदारसंघातील 11 हजार मतदारांची नावं कशी वगळण्याचा प्रयत्न झाला, हे अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकांमधील गैरप्रकारानंतर हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबत सातत्यानं वेगवेगळी वक्तव्य केली जात होती. या मुद्द्यावर शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यात यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलकडून नेतृत्वासाठी इच्छा व्यक्त गेली जात असल्याचं दिसलं आहे. त्यामुळे याबद्दलच्या निर्णयाकडेही सर्वांचं लक्ष आहे.