रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस जारी करताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली. मात्र, शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरले आहे. भाजप हिंदूंचा केवळ मतांसाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बांग्लादेशात हिंदू सुरक्षित नाहीत आणि महाराष्ट्रात मंदिरे सुरक्षित नाही, अशी त्यांनी सरकारवर टीका केली.
रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली. हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले. या मंदिरामुळे प्रवासी आणि वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच दादर स्थानकावरील पायाभूत सुविधांच्या कामातही अडथळा निर्माण होत आहे, असे रेल्वेने पाठवलेल्या नोटीशीत म्हटले.
आदित्य ठाकरे यांनी नुकतीच ट्विटरला एक पोस्ट केली, ‘भाजप केवळ निवडणुकीसाठी हिंदूंचा वापर करते असे दिसते. भाजप सरकारच्या रेल्वे मंत्रालयने मुंबईतील ८० वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस दिली. बांगलादेशात ना हिंदू सुरक्षित आहेत ना महाराष्ट्रात मंदिरे, कारण भाजप सरकारकडून आता मंदिरे पाडण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत’, अशी टिकाही त्यांनी केली.
मंगलप्रभात लोढा यांनी नोटीसीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती देताना असे म्हटले आहे की, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आमचे सर्व पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो. आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चाही केली. मंदिर हटवण्याबाबत काढण्यात आलेल्य नोटीसीला स्थगिती देण्यात आली. स्थगिती मिळाल्यानंतर कोणी कशाला आरती केली पाहिजे? धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मंदिराला काहीही होणार नाही, मंदिर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. जे मंदिर जुने आहे, त्याला कोणीही पाडणार नाही, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाच्या नोटीसीनंतर उद्धव ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन भाजपला हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या एक तो सुरक्षित है, या घोषणेचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतील ८० वर्षे जुने मंदिर पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कसले हिंदुत्व आहे? त्यांचे खरे राजकारण तोडफोडीचे आहे आणि त्यांनी आपली सत्ता वाढवण्यासाठी हिंदूंचा वापर केला, असेही उद्धव ठाकरेंनी केला.