महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात युवा आणि ज्येष्ठ असा समतोल साधला गेला आहे. तसेच सर्वच जातीच्या आणि धर्माच्या लोकांना संधी दिली गेली आहे. या मंत्रिमंडळात भाऊ-बहीण कॅबिनेट मंत्री झाले आहे. हे भाऊ-बहीण कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते. राजकारणात एकमेकांना पराभूत करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. परंतु आता महायुतीच्या दोन पक्षांकडून ते दोन्ही नेते कॅबिनेट मंत्री झाले. तसेच आता राजकीय विरोधकही राहिले नाहीत. बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण मंत्री झाले आहेत.
2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीमधील लढत चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा बहीण-भाऊ यांच्यात हा सामना झाला. त्यात 2014 मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विजयी झाल्या. परंतु पुढील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांनी या पराभवाची परतफेड करत 2019 मधील निवडणुकीत विजय मिळवला.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघं भाऊ-बहिणीमध्ये दिलजमाई होण्यासाठी अनेक पातळीवरून प्रयत्न झाले. अखेर परळी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते एकत्र आले. या दोघं नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत मैत्री दाखवली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारले. ते महायुतीत आले. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे महायुतीत आले. त्यामुळे भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या भाऊ-बहिणीचे संबंध सुधारु लागले.
महायुतीत धनंजय मुंडे कृषीमंत्री होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी सर्व जबाबदारी घेतली. परंतु पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे निवडून आले. आता हे दोन्ही मंत्री झाले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पोहचले. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना एकत्र अभिवादन केले. त्यानंतर आता दोघेही मुंबईच्या दिशेने एकत्र रवाना झाले आहे.