मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही घोषित केली असून आगामी काळात आणखी बऱ्याच मंडळींचा समावेश हा मुंबई कार्यकारणमध्ये असेल असे मत मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी आज व्यक्त केले.

मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत बोलताना समीर भुजबळ यांनी आज आपण जवळपास ७३ लोकांची कार्यकारिणी घोषित करीत असलो तरी कार्यकारिणीसाठी किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. टप्प्याटप्प्याने आपण सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करत मुंबई कार्यकारिणीमध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश करणार आहोत असे सांगितले.

आज घोषित झालेल्या कार्यकारिणीमध्ये एकूण १५  उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस, ३७ सचिव आणि ६ चिटणीसांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी  बबन मदने यांची देखील निवड करण्यात आली.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी  काँग्रेसच्यावतीने दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अजितदादांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे त्यामुळेच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मेळावा होत असून या मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वासही समीर भुजबळ यांनी व्यक्त केले.

आतापर्यंत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत कमी कालावधीत २ कार्याध्यक्ष,  २ महिला कार्याध्यक्ष , १ युवक अध्यक्ष , ६ जिल्हाध्यक्ष, ३६ तालुकाध्यक्ष, ६ महिला जिल्हाध्यक्ष, १९० वॉर्ड अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात महिला कार्यकारिणी आणि युवक कार्यकारिणी यांची देखील घोषणा करून महिला आणि युवकांना देखील समान संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील समीर भुजबळ यांनी यावेळी दिली.

मुंबई षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि मुंबईचे प्रभारी छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित  असणार आहे. या संवाद मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी केले आहे.