भाडीपाच्या कांदेपोहे कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आशिष शेलारांनी इशारा दिला आहे. तिकीट आकारून जर ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ सारखे कार्यक्रम विनापरवानागी घेतले जात असतील तर कारवाई करणार असं आशिष शेलार म्हणाले. या आधी मनसेनेही भाडिपाला विरोध करत या कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध केला होता. भाडीपातर्फे अश्लील कांदेपोहे हा कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र इंडियाज गॉट लेटेंटच्या वादानंतर तो रद्द करण्यात आला.
‘अतिशय निर्ल्लज कांदेपोहे’ या कार्यक्रमाचा पहिला भाग अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि टीमसोबत पार पडला होता. आता दुसऱ्या भागात सई ताम्हणकर सहभागी होणार होती. पण हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्याचा निर्णय भाडिपाने घेतला आहे. तसंच या शोसाठी ज्यांनी तिकिटं बुक केली होती त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत.
मनसेचा भाडिपाला विरोध
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या प्रकरणानंतर आता भाडिपा या यूट्यूब चॅनेलचा ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा शो चर्चेत आला. सेक्स कॉमेडी करत मराठी माणसाची मान शरमेने खाली घालणारा हा शो असल्याचा आरोप करत मनसेने या शोला विरोध केला. एवढंच नाही तर मनसे चित्रपट सेनेने पुण्यातील शो बंद पाडण्याचा इशारा दिला. या विरोधानंतर भाडीपाने या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलला. व्हॅलेटाईन्स डेनिमित्त होणारा सई ताम्हणकरचा स्पेशल शो रद्द होत असल्याची पोस्टही भाडिपाकडून शेअर कऱण्यात आली.
भाडिपाने नेमकं काय म्हटलं आहे?
रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर भाडिपाने त्यांचा शो रद्द केला. त्याबाबतची सोशल मिडिया पोस्ट देखील त्यांनी शेअर केली होती.
भाडिपाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटतं आहे की, सध्या वातावरण तापल्यामुळे 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्ल्लज कांदे पोहेचा शो आम्ही Postpone करत आहोत. तसंही Valentines Day ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या Fans वर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. तिकिटांचा Refund 15 Working Days मध्ये तुमच्या Account वर जमा होईल. Refund ने स्वतःसाठी काहीतरी छान Gift घ्या. आम्हाला माहीत आहे की आमच्या Fans चंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या Style ची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा Exclusive Content बघण्यासाठी खास YouTube Membership सुरु केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचे सर्व Videos 18+ वयासाठी Restrict केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता. अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य Show लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला… पण तुमचा यंदाचाही Valentines Day घरीच बसून जाणार”, असं लिहलं आहे.