मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची १० डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यापूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह ९ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक देखील झाली. त्यानंतर कोर्टात या सर्व हत्याकांडाचा सूत्र वाल्मिक कराड हाच असल्याचे उघडकीस आले. कोर्टात या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाले त्याचे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ झाला होता. अशातच आता ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी देखील धनंजय मुंडे यांचे एक जुने ट्विट शेअर केले आहे.
काय म्हणाल्या अयोध्या पोळ ?
आधीच भास झाला होता हे ट्विट भविष्यात कामी येईल म्हणून.. मी हे सांभाळून ठेवलं होतं.. तेंव्हा ABP Majha ची बातमी पाहून हे जपून ठेवले होते आज कामी आले…..
महाराष्ट्रातील तमाम जनतेनं पहावं की हा आधीपासूनच या व्यवसायात आहे…..
या प्रकरणाची महाराष्ट्रातील मीडिया दखल घेणार का?
Beed #बीड
DhananjayMunde #धनंजयमुंडे
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया …
धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक्स प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.”
“तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे,” असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मुख्यममंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाईकरता राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलं आहे.”