नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दाखवण्यात आले. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” हे बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील शब्द कानावर पडताच शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. मात्र या AI तंत्रज्ञानाच्या वापरावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता यावरुन सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या मेळाव्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या AI तंत्रज्ञानातील भाषणावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता यावर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेनेचा पोरखेळ सुरु, असा घणाघात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.
AI तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांची तोडफोड केली आहे. उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत, असेही तुम्ही वदवून घ्याल. शिवसेनेचा हा पोरखेळ सुरू आहे, असे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.
दुष्काळी सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याला नीरा देवधरचे पाणी मिळण्यास महाविकास आघाडीचे संजीवराजे निंबाळकर यांनी विरोध केल्याने शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. संजय राऊत रात्री विचार करून सकाळी राजकीय कळ लावतात. उद्या सोनिया गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या, असेही बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात काढून घेण्याचे काम संजय राऊत करू शकतात. त्यामुळे AI तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरेंचा आवाज निर्माण करणे योग्य नाही,” असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये राज्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी युती करूनच लढतील”, असा विश्वासही शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply