kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दुःखद बातमी ! लोकमान्य टिळकांचे पणतू ,‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला शोक

एक दुःखद बातमी समोर येत आहे. पुण्यात लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी दिपक टिळक यांचं निधन झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे डॉ. दीपक टिळक हे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद त्यांनी भूषवलं असून ते काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा त्यांनी पुढे नेला. वर्ष २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.