वांद्रे पूर्व येथे असलेल्या कार्यालयाबाहेर 12 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या हत्या प्रकरणात कुप्रसिद्ध गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचा सहभाग असल्याचा आरोप होता. अमेरिकेतून त्याचे प्रत्यार्पण केल्यानंतर बुधवारी NIA ने त्याला अटक केली. सिद्दीकी हत्या प्रकरणाबरोबरच अभिनेता सलमान खानच्या घरावर केलेला गोळीबार (एप्रिल 2024), सिद्धू मूसेवालाची हत्या याचबरोबर खंडणीखोरीचीही अनेक प्रकरणे अनमोल बिश्नोईविरोधात दाखल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी आणलेल्या नवीन इमिग्रेशन धोरणानुसार अनमोलचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था एनआयएने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, 2022 पासून फरार असलेला अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईच्या कट्टरतावादी सिंडिकेटशी संबंधित असून, या प्रकरणात अटक होणारा तो 19 वा आरोपी ठरला आहे. एनआयएने मार्च 2023 मध्ये त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. 2020 ते 2023 दरम्यान देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये अनमोल लॉरेन्स बिश्नोई आणि घोषित दहशतवादी गोल्डी ब्रार यांना सक्रियपणे मदत करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
एनआयएने काय सांगितलं?
एनआयएने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “अनमोल अमेरिकेतून लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी दहशतवादी सिंडिकेट चालवत तो भारतात असलेल्या बिश्नोई गँगच्या सदस्यांना सूचना देत असे.
अनमोलने गँगच्या शूटर्सना आणि ग्राउंड ऑपरेटिव्ह्जना निवारा आणि लॉजिस्टिक मदत पुरवल्याचंही तपासात उघड झालं आहे. तसेच परदेशातूनच इतर गँगस्टरांच्या मदतीनं भारतात खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलं आहे.
अनमोल बिश्नोईचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणातही आरोपी म्हणून समोर आलं आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी मंगळवारी सांगितलं होतं की अनमोल बिश्नोईला 18 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं आहे.
त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितलं होतं की, “माझं कुटुंब अमेरिकेत पीडित कुटुंब म्हणून नोंदणीकृत आहे. व्हिक्टिम नोटिफिकेशन सिस्टममुळे आम्हाला अनमोल बिश्नोईबाबत अपडेट्स मिळत राहतात. आज आम्हाला एक ईमेल आला, ज्यात म्हटलं आहे की 18 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या फेडरल सरकारने अनमोल बिश्नोईला देशातून हद्दपार केलं आहे.”











