अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन लाख सात हजार नऊ मतदार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी (दि.20) प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द केल्या. या याद्या महापालिकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय तसेच मनपा संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. या याद्यावर 27 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आलेल्या आहेत.
महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडत आणि मतदार याद्या आवश्यक आहेत. त्यानुसार आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी(दि.20) प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द केल्या आहेत. मतदार याद्या प्रसिध्द करण्यासाठी 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीचा आधार घेण्यात आला आहे. या विधानसभेच्या मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन करून अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून, प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये विभागून प्रभागनिहाय छापून घेत अधिप्रमाणित केलेली आहे.














