kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आढळराव पाटील करणार 26 मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश ; आढळराव आणि कोल्हे यांच्यातच होणार थेट लढत

शिरुरमध्ये पुन्हा एकदा यापूर्वीचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ अमोल कोल्हे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश आता निश्चित झाला आहे. २६ मार्च रोजी आढळराव पाटलांचा प्रवेश होणार आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशावर केलं शिक्कामोर्तब !

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ज्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होणार आहे ते शिवाजीराव आढळराव पाटील आणि काही पदाधिकाऱ्यांची आणि आमची बैठक झाली. त्यानंतर २६ तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्ष प्रवेशाचा सोहळा आढळराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.

काय म्हणाले आढळराव पाटील ?

यावर आढळराव पाटील म्हणाले, जी आकडेवारी आहे त्यात माझ्याकडं काहीही नसताना मी पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकलो, दुसरी १ लाख ८० हजारांनी तर तिसरी निवडणूक ३ लाख ३० हजारांनी जिंकलो होतो. त्यानंतर आता चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे.

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील केलं भाष्य :

तर आढळराव पाटील यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनातून राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यानं त्यावर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “आपदधर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्ध शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी मिळून याबाबत निर्णय घेतला असेल. आढळराव पाटलांनी खूप चांगलं काम मतदारसंघात केलेलं आहे. त्यामुळं ते पुढच्या काळात निवडून येतील, पण त्यामुळं आजच्या घडीला गैरसमज पसरता कामा नये”