kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल

भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) आलेले एकनाथ खडसे घरवापसीच्या प्रयत्नात असल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. अशातच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी अलीकडेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खडसे स्वगृही परतणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. एकनाथ खडसे भाजपाच्या दिल्लीतल्या नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचा दावाही महाजन यांनी केला होता. तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट सातत्याने असे दावे करत आहे. महाविकास आघाडीतले आणखी काही नेते महायुतीतल्या पक्षात सहभागी होतील, अशी वक्तव्ये महायुीततले नेते करत आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. पाठोपाठ आज त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गेल्या महिन्याभरात काँग्रेसचे दोन नेते शिंदे गटात आणि अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे महायुतीतले नेते दावा करत आहेत की आगामी काळात मविआतील आठ ते दहा नेते महायुतीत सहभागी होती. “राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट होईल”, “आगे आगे देखिये होता है क्या”, “महाविकास आघाडी नामशेष होईल”, अशा प्रकारची वक्तव्ये महायुतीतल्या नेत्यांकडून होत आहेत. तसेच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यासारखे महायुतीतले काही नेते महाविकास आघाडीतल्या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीत येण्याची ऑफर देत आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे स्वगृही परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. यावर एकनाथ खडसे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ खडसे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर, फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा आफवा पसरवल्या जात आहे. माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने हे केलं जात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे आणि राहीन. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावं.