kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा

दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा अजितदादा पवार यांनी आज पुणे येथे केली.

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींसह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीच्या ४८ जागा असून त्यामध्ये जवळपास कुणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत मागेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ९९ टक्के काम झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणूक होणार आहे.

आंबेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील हे २० वर्षापूर्वी पक्षातून गेले होते ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरी जागा तिथेच जाहीर करेन असे सांगतानाच बाकीच्या जागा २८ मार्चला जाहीर करणार आहोत असे अजितदादा पवार म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या एक नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक – एक लोकसभा आणि आमदारांवर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पध्दतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करु असा निर्धार करण्यात आल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीत कुणालाही भेटण्याचे आणि बोलण्याचा अधिकार आहे. माझ्यावर टिका होते आहे आणि तुम्हीही करु शकता माझी भूमिका ही फक्त विकासाला, देश प्रगतीपथावर पुढे चालला आहे. आज जगात देशाचे नाव वाढत आहे. प्रतिष्ठा मिळाली आहे असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.