प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी आधी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पितापुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांची अंबानींनी भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंबानींनी नेमकी काय आणि कोणत्या विषयावर चर्चा केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुकेश अंबानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या बैठकीला ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजसही उपस्थित असल्याची माहिती आहे.
त्यानंतर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अंबानी पितापुत्र ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. तिथेही तासभर त्यांच्या बैठका झाल्या. या दोन्ही भेटीगाठींमागील नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे व्यावसायिक कारण आहे, कुठल्या कौटुंबिक कार्यक्रम किंवा सोहळ्याचं निमंत्रण आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सिलसिला पार पडला, हे स्पष्ट झालेलं नाही.