राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. त्यातच सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतलीय. कारण मनसेकडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने मनसेने दोन उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पंढरपूरमधील दिलीप धौत्रे यांना संधी देण्यात आली आहे. राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोलापूरमध्ये असतानाच राज ठाकरे यांनी पंढरपूरमधून दिलीप धौत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, शिवडीमधून अपेक्षेप्रमाणे बाळा नांदगावरकर यांचे नाव समोर आले आहे.

राज ठाकरे यांनी जाहीर केलेले उमेदवार

१. शिवडी विधानसभा- श्री.बाळा नांदगांवकर

२. ⁠पंढरपूर विधानसभा – श्री.दिलीप धोत्रे

शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडे यांचा पराभव करुन, दुसऱ्यांदा विधानसभेवर ठाकरेंचा झेंडा फडकवला होता.

शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1995-2004) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.

दिलीप धोत्रे हे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत काम करत आहेत. धोत्रे यांनी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यात संघटनेचे काम वाढवले आहे. अलीकडेच दिलीप धोत्रे यांच्याकडे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी धोत्रे यांनी २००४ साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी पंढरपूरमधून विश्वासू शिलेदाराला मैदात उतरवलं आहे असं म्हणावं लागेल.

राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी कंबर कसल्याचं दिसत आहेत. जवळपास २५० मतदारसंघांचा अभ्यास केला जात आहे. यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. जिंकून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.