महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असे बोलले जात आहे. शिवाय, राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मतं मिळतील, याबाबतचा नवा सर्वे समोर आलाय. इंडिया टुडे-सी व्होटर्सचा ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हे समोर आलाय.

इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळू शकतात. तर महायुती 120 ते 130 जागांवर मुसंडी मारु शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला 42 टक्के मतं मिळू शकतात तर महाविकास आघाडीला 44 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 43.71 टक्के मतं मिळवली होती, तर महायुतीला 43.55 टक्के मतं मिळवण्यात यश आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळेल, असाच सर्व्हेचा अंदाज आहे. शिवाय, मविआला 150 ते 160 जागा आल्यास मविआची महाराष्ट्रात सत्ता देखील येऊ शकते. याशिवाय या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 3.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे. शिवाय, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, शेतकरी नेते राजू शेट्टी, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांसारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास अनेक मतदारसंघांमध्ये 3 ते 4 उमेदवार उभे राहू शकतात, याचा फटका कोणाला बसणार हे पाहाणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दाही महाराष्ट्रात चांगलाच तापलाय. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फायदा झाला, असं महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.