मुंबईत दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी हे रात्री ९ च्या सुमारास त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा हल्लेखोर फरार आहे. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर पोस्ट लिहिली आहे.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया काय?
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे असंही राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.