राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांसाठी मतदान होत असून महाविकास आघाडीनंही निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. काही अफवा पसरवल्या जात असल्या तरी आम्ही निवडणूक लढवत आहोत. निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी आम्ही मैदानात आहोत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. विधान परिषद निवडणूक ही गोपनीय मतदान पद्धतीनं होत असल्यानं निकालाबाबत आताच काही सांगता येणार नाही. नाशिकमध्ये काय घडतं, ते पाहावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं. नाशिकमध्ये मी इतर कामांमुळे सक्रिय नव्हतो. दोन जणांनी अर्ज घेतले होते. घोडेबाजार होऊ नये, अशी मिर्लेकर यांची भूमिका होती. सध्या राज्यात घोडेबाजार सुरू असल्याचा आरोपही खासदार संजय राऊतांनी केला.
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. “आम्ही कोणाला मतदान केलं हे निकालाच्या वेळी कळेल. आमचा पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू शिंदे गट आहे,” असा हल्लाबोल राऊतांनी केला. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात, अशी भूमिका काही नेत्यांकडून व्यक्त केली जात असताना राऊतांनी यावरही भाष्य केलं. “आम्ही मातोश्रीवर बसलो आहोत. जर त्यांना पश्चात्ताप झाला असेल, तर तो व्यक्त करण्यासाठी मातोश्री हेच योग्य ठिकाण असल्याचंही ते म्हणाले.” अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना राऊतांनी हे वक्तव्य केलं.
आमच्याकडे असलेली मतं कोणाला द्यायची याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात आला. उमेदवार दिला नाही, ही आमची चूक नाही. मतांमध्ये मोठी तफावत असल्यानं कोणी इच्छुक पुढे आलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या निकालावेळी आम्ही कोणाला मतदान केलं हे समोर येईल. आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू शिंदे गट आहे, असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा या फसवणुकीचा प्रकार असल्याचा दावा राऊतांनी केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीसह अनेक योजनांमध्ये फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नसतील, तर त्यांनी भाजपाला मतदान करू नये. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना शेतकऱ्यांनी जाऊ नये, असं आवाहनही राऊतांनी केलं. शेतकरी सभांना गेले नाहीत, तर त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी लागेल आणि अनेक प्रश्न सुटतील, असंही ते म्हणाले.













Leave a Reply