आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. कोकणात विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे. कोकणातील विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बाळ माने यांनी माघार घेतली आहे. भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे येथून महायुतीचे उमेदवार असलेले अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा काही अवधी उरला असतानाच कोकणात मोठा ट्विस्ट आला आहे. कोकणातील विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीने उद्धवसेनेचे बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. तर सत्ताधारी महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघामध्ये महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक होती, अखेरीस या निवडणुकीतून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी सांगितले की, महाविकास आघाडीमधील सर्वांनी मला उमेदवार करण्यासाठी संमती दिली होती. याचा अर्थ असा होता की, उमेदवारी अर्ज भरताना मित्रपक्षातील मतदार सदस्यांनी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं. मी अनेकवेळा मागणी करून सुद्धा सह्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. माझ्या पक्षाच्या सदस्यांनी सह्या केल्या होत्या. मात्र आज मी आढावा घेतला तेव्हा मतांसाठी घोडेबाजार सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा प्रकारे घोडेबाजार करून निवडणुका लढवणे हे काही कोकणच्या संस्कृतीच्या हिताचे नाही, असा मीच विचार केला. तसेच ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे बाळ माने म्हणाले.













Leave a Reply