kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! प्रकाश म्हात्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला कल्याण लोकसभेत पुन्हा एकदा झटका बसला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उबाठा गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ?

तर या सर्वांना उबाठा गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आठवडाभरात उबाठा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे. उबाठा गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.