पणजी, भाजपकडून प्रत्येक निवडणुकीवेळी खाणी सुरू करण्याचे आश्‍वासन देऊन अवलंबितांना फसविले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील खाणी, कोळसा वाहतूक आणि पक्षांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस भवनात झालेल्या या परिषदेला काँग्रेसचे प्रवक्ते तुलिओ डिसोझा, गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा आश्मा बी आणि आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष संदेश तळेकर देसाई यांची उपस्थित होती.

तुलियो म्हणाले, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण घोटाळ्याचा आरोप केला होता आणि त्यांनी सभापतींच्या कार्यालयात पीएसी अहवाल सादर केला. खाणकामात ३५ हाजार कोटींचा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण नंतर त्याचे काहीच झाले नाही. खाण घोटाळा ३५ हजार कोटी रुपयांचा असू शकतो, असे शाह आयोगाने म्हटले होते.

त्यानंतर भाजप सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. या तपासात काय झाले आणि त्यात कोणाचा सहभाग होता, हे सरकारने स्पष्ट करावे, काँग्रेसवर आरोप करून सत्ता बळकावण्यासाठी खाण घोटाळ्याचा वापर केला काय, हे भाजपने स्पष्ट करावे. डिसोझा यांनी आमदार संकल्प आमोणकर यांच्यावर टीका केली.

तळेकर देसाई म्हणाले, कोळसा हाताळणी बंद करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले असले, तरी आश्‍वासनाकडे दुर्लक्ष करून कोळसा हाताळणी सुरूच आहे. लोक कोळसा हाताळणीच्या विरोधात आहेत. पण हे डबल इंजिन असूनही सरकारने कोळसा हाताळणीसाठी पर्यावरण मंजुरी दिल्याचे त्यांनी नमूद केले.