“यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचे आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे” अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. कॉंग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते.

चंद्रकांत दायमा यांचे काम एकत्रित कॉंग्रेस असताना एकदम जवळून पाहिले असल्याचे सांगतानाच सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल यासाठी ते काम करत आले आणि आज ती शिस्त पुढे नेत आहेत हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये. पक्षाला अडचण निर्माण होईल आणि राज्यातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वक्तव्य करु नये भान ठेवून वक्तव्य करा अशी स्पष्ट शब्दात समज अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.
सर्वधर्मसमभावाची भूमिका आपल्या पक्षाची आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचाराने सुरु असलेले हे राज्य आम्ही पुढे नेत आहोत म्हणूनच आम्ही केलेल्या कामाला त्यांचा आशिर्वाद मिळाला आहे. आता लोकांच्या अपेक्षा मोठया आहेत. प्रचंड बहुमताने राज्यात सत्ता आली आहे. लाडक्या बहिणीसाठी काम करत आहोत. दिशाभूल करुन काम फारकाळ टिकत नाही. होणार नसेल तर काम होणार नाही हे आम्ही स्पष्ट करतो या मताचा असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षात येणाऱ्यांची जनमानसात प्रतिमा चांगली असली पाहिजे. चुकीचे काम केलेले असेल त्यावर पांघरूण घालण्यासाठी कोण येत असेल तर त्यांनी ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावे. मला कायदा श्रेष्ठ वाटतो आणि मी कायद्याचा आदर करतो हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व घटकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले तसे काम आपल्या या पक्षात झाले पाहिजे. महिलांचा, वडीलधारी लोकांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. याकृतीने काम करा असे सांगतानाच हल्ली ज्याच्या त्याच्या पाया पडण्याची एक पध्दत सुरू झाली आहे परंतु आपल्या आई-वडिलांच्या पहिल्यांदा पाया पडा पण तसे होत नाही पुढाऱ्यांच्याच पाया पडताना जास्त लोक दिसतात मात्र हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असे स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
जाहीर प्रवेश केलेल्यांमध्ये राष्ट्रीय संघटक शशिकांत थोरात, मराठवाडा प्रदेश संघटक जयंत काथवटे, लातूर जिल्हा प्रदेश संघटक बिरबल देवकाते, उस्मानाबाद संघटक विलास साळू, जालना संघटक मंत्री शरद देशमुख, छत्रपती संभाजीनगर संघटक प्रकाश पडवळ, नागपूर संघटक चंद्रकांत नवघरे, आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यातील कॉंग्रेस सेवादलाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम महिला विकास मंडळ सभागृह येथे पार पडला. यावेळी परभणीतील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार राजेश विटेकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, चंद्रकांत दायमा, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, अल्पसंख्याक सेलचे वसीम बुर्हाण आदी उपस्थित होते.
Leave a Reply