Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार ; महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेला प्रचार टिपेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. महायुतीच्या उमदेवार राजश्री पाटील यांच्यासाठी विविध बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे मोठ्या सभांच्या बाबतीत मागे पडल्याचे चित्र आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २४ ला सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस उमेदवारांसाठी ‘करो या मरो’ या पद्धतीचे राहणार आहेत. वैयक्तिक बैठका, रॅली, जाहीर सभा, कॉर्नर बैठका यावर दोन्ही उमदेवारांनी भर दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा चालविली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापर्यंत तीनवेळा यवतमाळ-वाशिम मतदारसंघात राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी येवून गेले आहेत. येत्या २४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा यवतमाळ येथे रॅलीसाठी येणार आहेत. ते यवतमाळात बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत.

आज रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राळेगाव येथे जाहीर सभा होत आहे. राळेगाव हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. येथे भाजपचे आ. प्रा. डॉ. अशोक उईके हे आमदार असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आजची सभा राजश्री पाटील यांच्यासह आमदार उईके यांच्यासाठीही महत्वाची ठरणार आहे. राजश्री पाटील या वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यवतमाळात त्यांची अद्यापही मोठी सभा झाली नाही. त्यामुळे येत्या २३ एप्रिल रोजी येथील पोस्टल मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व रोहित पवार वगळता अन्य कोण्याही बड्या नेत्याची सभा जिल्ह्यात झाली नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके आदी त्यांच्यासाठी सभा, बैठका घेत आहेत. मात्र वलयांकित नेत्याची अद्याप एकही सभा न झाल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. उरलेल्या तीन, चार दिवसांत उमेदवारांना आपले नाव व चिन्ह मतदारांच्या मन आणि मेंदूपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागणार आहे.