‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार असून तिने एक स्कॅम उघडकीस आणला आहे. शिवगड येथील आमदार आणि गुहागर येथील सुविद्या कॉलेजचे ट्रस्टी दादासाहेब मोहिते यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकार तिने उघडकीस आणला आहे. याबद्दल राजकीय वर्तुळातील अनेक स्कॅम उघडकीस आणणाऱ्या राजकीय नेत्या चित्रा वाघ यांचीदेखील ‘दुर्गा’ने प्रतिक्रिया घेतली आहे. दुर्गाला तिच्या लढ्यात चित्रा वाघ यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेलाही चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘दुर्गा’ला पाठिंबा देत चित्रा वाघ म्हणाल्या आहेत,”शिक्षण घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील खूप झटत असतात. अशाप्रकारे आई-वडीलांचे कष्ट आणि मुलांची मेहनत यामध्ये जर असे प्रकार होत असतील.. मुलांना कॉपी करावी लागत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. दादासाहेब मोहिते स्वत: त्यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकारात लक्ष घालतील आणि पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याचीदेखील काळजी घेतील याची मला खात्री आहे. दुर्गा तुझ्या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे”.

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. एखाद्या मालिकेच्या प्रमोशनसाठी चक्क राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेचं प्रमोशन राजकीय नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. दुर्गाने घेतलेली चित्रा वाघ यांची मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

‘दुर्गा’ ही मालिका प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर दररोज संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळेल. प्रेम आणि प्रतिशोधात ‘दुर्गा’ नक्की कशाची निवड करणार? या प्रश्नाचं कोडं लवकरच सुटणार आहे. ‘दुर्गा’ या मालिकेत रूमानी खरे आणि अंबर गणपुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच राजेंद्र शिरसतकर शिल्पा नवलकरही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.