५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपा विरूद्ध आम आदमी पक्ष असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. यात दिल्लीतील नऊ मतदारसंघात तर हा संघर्ष किंचित जास्त दिसून येत आहे. कारण येथे २०२० साली झालेल्या निवडणुकीत विजयाचा फरक हा ४००० मतांपेक्षा कमी होता.
५ वर्षांपूर्वी आपने या ९ जागांपैकी आदर्श नगर, शालीमार बाग, बिजवासन, कस्तुरबा नगर, छतरपूर, पटपडगंज आणि कृष्ण नगर हा सात जागा आपने जिंकल्या होत्या. तर भाजपाने लक्ष्मी नगर आणि बदरपूर येथे विजय मिळवला तर इतर जागांवर तो दुसर्या क्रमांकाचा पक्ष राहिला होता. यापैकी अनेक जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनाही विजयाच्या फरकापेक्षा जास्त मते मिळाली होती. या ९ जागांपैकी लक्ष्मी नगर येथे २०१५ साली देखील अटीतटीच लढत झाली होती. तेव्हा येथे आपचा उमेदवार ४,८४६ मतांनी विजयी झाला होता. तर २०२० मध्ये भाजपानेही अवघ्या ८८० मतांच्या फरकाने आपल्याकडे खेचून घेतली होती.
बदरपूर येथे भाजपा आणि आप यांच्यात लढत झाली होती, ज्यामध्ये भाजपावा विजय मिळाला. येथेही विजयी मतांचा फरक हा ३,७१९ मतांचा होता. येथे मयावती यांच्या बहुजन समाज पार्टी पक्षाने आपची मते घेतली. त्यांच्या उमेदवाराला १०, ४३६ मथे मिळाली आणि तो उमेदवार काँग्रेसला मागे सारून तिसर्या क्रमांकावर राहिला. २०१५ मध्ये आपने ही जागा ४७,५८३ इतक्या प्रचंड मतांनी जिंकली.
बिजवासन येथे २०२० मध्ये सर्वात अटीतटीची लढत झाली ज्यामध्ये आपने ७५३ मतांनी विजय मिळवला. भाजपानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला जवळपास ६ हजार मते मिळाली. आदर्श नगरमधील चुरशीच्या लढतीत, आपने विजय मिळवला मात्र २०१५ च्या तुलनेत पक्षाच्या विजयाचे अंतर २० हजार मतां हून २०२० मध्ये १५८९ वर घसरले.
आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही पटपडगंज जागेवर थोडक्यात बचावले होते. २०१५ मध्ये २८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविलेल्या सिसोदिया यांना २०२० मध्ये भाजपाविरोधात फक्त ३,२०७ मतांनी विजय मिळाला होता. पटपडगंजमधील दोन्ही निवडणुकांमध्ये उपविजेते ठरलेल्या भाजपाने २०१५ मधील ३३ टक्क्यांवरून २०२० मध्ये ४७ टक्के मतांवर झेप घेतली. सिसोदिया यांनी यावेळी उमेदवारीची जागा बदलली आहे आणि ते जंगपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, जो २०२० मध्ये आपने १६ हजारांहून अधिक मतांनी जिंकला होता.