दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या सत्तेला सुरुंग लावत 27 वर्षांनतर दिल्ली मोठं यश मिळवलं आहे. मात्र भाजप सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाने ही निवडणूक अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर लढवली. भाजपानं तसा दिल्लीतील कोणत्याही नेत्यावर विशेष फोकस केला नव्हता. तसंच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही जाहीर केला नव्हता. त्यामुळे दिल्लीत भाजपा कुणाला मुख्यमंत्री करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दिल्लीत भाजपाची 1998 पर्यंत सत्ता होती. मदनलाल खुराणा, साहेबसिंह वर्मा आणि सुषमा स्वराज या तीन भााजपा नेत्यानं राजधानीचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. त्यापैकी कोणताही नेता आता हयात नाही. गेल्या 27 वर्षांमध्ये भाजपाची संपूर्ण पिढी बदलली आहे. भाजपा दिल्लीत अडीच दशकांहून जास्त काळ सत्तेपासून दूर असली तर पक्षात मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत.

प्रवेश वर्मा : माजी मुख्यमंत्री साहेबसिंह वर्माचे चिरंजीव असलेले प्रवेश हे पश्चिम दिल्लीचे दोन वेळा खासदार होते. ते जाट समाजातील असून भाजपाच्या जातीय समीकरणाच्या गणितातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आक्रमक शैलीमुळे ते भाजपा कार्यकर्त्यांमध्येही लोकप्रिय आहेत.

विजेंदर गुप्ता : दिल्ली विधानसभा निवडणूक 2015 आणि 2020 मध्ये आम आदमी पक्षाची लाट होती. त्या लाटेतही विजेंदर गुप्ता यांनी त्यांचा रोहिणी विधानसभा मतदारसंघ राखला होता. माजी दिल्ली भाजपा अध्यक्ष असलेले गुप्ता दिल्ली विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देखील होते. आम आदमी पक्षाच्या लाटेतही आपली जागा वाचवणारे अनुभवी विजेंदर गुप्ता भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

कपिल मिश्रा : आम आदमी पक्षाचे माजी नेते असलेले कपिल मिश्रा आता आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद भूषविणारे मिश्रा दिल्ली भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. करवाल नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मिश्रा आम आदमी पक्षाचा गैरकारभार जनतेसमोर मांडण्यात आघाडीवर होते. मुख्यमंत्रिपदाचे ते दावेदार असू शकतात.

मनजिंदर सिंग सिरसा : दिल्लीत शिख समुदायाचे महत्त्वाचे नेते असलेले सिरसा राजौरी गार्डन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी यापर्वी दोन वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते यापूर्वी भाजापाचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलमध्ये होते. दिल्ली शिख गुरुद्धारा प्रंबध समितीमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. देशभरातील विशेषत: 1984 मधील दंगलीत होरपळलेल्या शिख समुदायात एक चांगला संदेश देण्यासाठी मनजिंदर सिंग सिरसा हे भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे अनपेक्षित उमेदवार ठरु शकतात.

सतीश उपाध्याय : दिल्लीतील अनुभवी भाजपा नेते असलेले सतीश उपाध्याय हे दीर्घकाळ दिल्लीतील विद्यार्थी राजकारणाशी संबंधित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चामध्ये त्यांनी महत्त्वाची पदं भूषविली आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या रणनितीमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. निवडणूक प्रचाराच्या दरम्यानही भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिले जात होते.

या नेत्यांशिवाय दिल्लीनं मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला संधी देण्याचं ठरवल्यास रेखा गुप्ता किंवा शिखा राय यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दलित नेते दुष्यंत गौतम हे देखील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.