महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला बाधा आणणाऱ्या व शांततापूर्ण वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या जाहीर विधानांमुळे राज्यात असंतोषाची ठिणगी पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथे आदरणीय शरद पवार साहेबांविरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे विधान केवळ एक राजकीय टीका नसून जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा व जातीय द्वेष पसरवण्याचा कट आहे. अशा वर्तनामुळे महाराष्ट्राच्या प्रगतशील व शांतताप्रिय संस्कृतीला तडा जाऊ शकतो. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले.
“तोंडाने गोड बोलायचं आणि मनात विष ठेवायचं” या म्हणीला तंतोतंत लागू ठरणाऱ्या अशा कृतींवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
आम्ही साकीनाका पोलीस ठाण्याकडे मागणी करतो की, या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत भारतीय दंड संहितेच्या कलम 192, 352, 59 व 61-अ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले.
“सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी कायद्याची काठी हाती घेणे आवश्यक आहे.”
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची रक्षा करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असून राज्यातील प्रत्येक जबाबदार नागरिकाच्या मनात विश्वास निर्माण होईल.
“एकाची चूक दुसऱ्याच्या शांततेचा बळी ठरता कामा नये.”
शांतता व समाजिक सौहार्द टिकविण्यासाठी प्रशासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना करावी.