मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील अशा चर्चा होत्या आणि घडलंही.. मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर आणि कणखर नेतृत्वासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत हे जाहीर केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

सस्नेह स्वागत !

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.