धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नाही आणि असे तपासात समोर आलेले नाही मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे अशी पक्षाची भूमिका स्पष्ट करणारी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमच्या पक्षाच्या नेत्यांनी अगदी बीडपासून राज्यभरातील नेत्यांनी घेतली होती असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे.
आज धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो तसाच चालू राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयात असून त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्याही गुन्ह्याला किंवा गैरकृत्याला आमचे अथवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही हाच संदेश आजच्या घटनेतून राज्याला गेला असल्याचे सुनिल तटकरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणात अजितदादांनी ठाम भूमिका घेतली होती. न्यायव्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.