लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी नागपूरमधून (Nagpur) फुंकले. मात्र राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय.
सध्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशात संविधान सन्मान संमेलन घेत आहेत. या माध्यमातून संविधान काय आहे, संविधानाने प्रत्येक नागरिकाला काय दिले, याबाबत राहुल गांधी सांगत आहेत. परंतु यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाल संविधान कोणाला दाखवता, अहो फडणवीसजी संविधान सर्वधर्म समभाव मानते. परंतु, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? हे भारतीय जनतेला सांगा, असे म्हणत सचिन खरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय.
नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. राहुल गांधी यांची नागपुरात संविधान सभा होणार असली तरी खोट्याचे वय अत्यंत अल्प असते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पसरवलेला भ्रम आता दूर झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नाटक जनता आता चालू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.