kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वारा आणि पावसामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याखाली दबून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला. या घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी अंबादास दानवे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी भेट दिल्यावर अंबादास दानवे यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, रुग्णांवर योग्य ते उपचार होत आहेत की नाही, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली. यावेळी, सरकारने २०२२ ला होर्डिंग्ज धोरण आणले, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले.

अशा दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंग्ज धोरणात नियमावली बनविण्यात आली असल्यामुळे या होर्डिंग्ज धोरणाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असे अंबादास दानवे म्हणाले. तसेच, या घटनेला जबाबदार असलेल्या स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यातील मृत, जखमी तसेच ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले. या सर्वांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. होर्डिंग्ज धोरणानुसार, राज्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली.

याचबरोबर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप माणसांचा जीव गेला. ‘चंदा लो, धंदा दो’ अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरु असल्यामुळे अशा घटना घडत आहेत, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.