Breaking News

मुंबईतील माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सीताराम दळवी यांचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक मोठ्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सीताराम दळवी हे मनसे नेते संदिप दळवी यांचे वडील आहेत. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी शिला, मुलगा संदीप, मुलगी प्रतिमा आशिष शेलार, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आरोस गावातील होते. मात्र, मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते. अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत होते.

सीताराम दळवी हे मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये शिवसेनेच्‍या तिकिटावर विजयी झाले होते. त्‍याआधी त्यांनी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून पद भूषवले होते. शिवेसेनेच्‍या उभारतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता.