Breaking News

फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार – प्रवीण दरेकर

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठा इशारा दिला आहे. विरोधक कसे खोटे नरेटिव्ह सेट करतात, त्याचा पर्दाफाश मी उद्या करणार आहे, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. त्यामुळे प्रवीण दरेकर आता नेमका काय पर्दाफाश करतात? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

प्रवीण दरेकर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देत प्रवीण दरेकर म्हणाले की, त्यांनी इतरांवर राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल द्यायला सुरुवात केली आहे. या आंदोलनात कशा पद्धतीने फेक नरेटिव्ह सेट केले जातात, वक्तव्य केली जातात. या संदर्भातील पर्दाफाश मी उद्या करणारच आहे. महाराष्ट्रात सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सकारात्मक आहे. पण ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या, या मागणीसोबत कुणीही राजकीय पक्ष सहमत नाही. जरांगेंनी ज्या मागण्या केल्यात त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

“शरद पवार बोलत आहेत की, ओबीसींसाठी काम करणारे लक्ष्मण हाके आणि मराठा नेते मनोज जरांगे यांना घेऊन बैठक करावी. अशा बैठकीसाठी कुणीही विरोध करत नाही. जरांगे बोलतात, आम्ही बैठकीत येऊन काय करणार? एका व्यासपीठावर सर्वांनी येण्याची गरज आहे. यामुळे महाराष्ट्रासमोर स्पष्ट भूमिका येईल. शरद पवारांनी या बैठकीत उपस्थित राहून भूमिका मांडावी, असा आग्रह आहे. निवडणूक पाहून भूमिका घ्यायची नाही, असे चालणार नाही”, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

पुढे प्रवीण दरेकर म्हणाले की, “आमदारासारख्या महत्वाच्या लोकप्रतिनिधी, नेत्यानेही आपण महायुती म्हणून सामोरे जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येईल, अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. खो-खो सारखं खेळ खेळू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मेळाव्यात सांगितले होते की, कुणाला खुमखूमी आली तर पक्ष प्रमुखांशी बोला. कुणीही अशा प्रकारे महायुतीत वाद होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर, निवडणुकीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नये”, असे खडेबोलही प्रवीण दरेकर यांनी सुनावले.

प्रवीण दरेकर म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत, त्यात दुमत असायचे कारण नाही. दोन्ही दादांनी (नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील ) केलेली वक्तव्ये ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात २८८ जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भाजपकडे आहेत. तसेच, महायुती समन्वयाने, सुसंवादातून-एकोप्याने महायुती म्हणून सामोरे जाऊ आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.