आज विजयादशमीच्या मुहुर्तावर मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे झाले आहेत. त्यातील आझाद मैदानावर झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटावर निशाणा साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. तर पळवणारा आहे, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आझाद मैदान येथील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले की, काहींना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना हिंदू शब्दाची लाज वाटतेय, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी बसवून आपलं सरकार आलं तेव्हा हे सरकार काही दिवसांत पडेल. पंधरा दिवसांत पडेल. एका महिन्यात पडेल. सहा महिन्यांत पडेल. असे दावे केले जात होते. पण टीका करणाऱ्याला हा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आणि तुमच्या आशीर्वादाने आणि साथीने या सरकारने घासून, पुसून नाही तर ठासून दोन वर्ष पूर्ण केली, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर ठाकरे गट आणि विरोधकांनाही एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला, ते म्हणाले की, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. तर पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाहीत. म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो. आज हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात जिथे जिथे जातो, तिथे सगळे जण हसत स्वागत करतात. आशीर्वाद देतात, हेच आपण कमावलं आहे. दोन वर्षांच्या अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *