Breaking News

… त्याबद्दल मला अभिमान आणि आनंद आहे ; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे खूश

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे अतिशय आनंदात दिसले. “पहिली प्रतिक्रिया अशी आहे की, आपल्या देशामध्ये सर्वासमान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलं आहे. त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांना रोखू शकतो हे आज देशाच्या जनेतेने जगाला दाखवलं आहे. त्याबद्दल मला अभिमान आणि आनंद आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. मी उद्या दुपारनंतर इंडिया आघाडीच्या बैठकीला जाईन. कारण आमच्या बाहेरगावचे खासदार उद्या येतील. ते मला भेटतील. सर्वात आधी राज्यसभेचे खासदार संजय राऊत तिथे जातील. त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत हे देखील असतील. दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीला पोहोचेन”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासाठी पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, इंडिया आघाडी स्थापन केली तेव्हापासून सांगतोय की, आमच्यापैकी कुणीही पंतप्रधान पदासाठी इच्छुक नाही. देशातील लोकशाही, संविधान वाचवलं पाहिजे, हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही आमची एकत्र येण्यामागची भावना होती. हीच भावना अजूनही कायम आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला जाईल. आम्ही सोबत राहू”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

“एनडीएकडे बहुमत आहे, असं दाखवलं जातंय. पण बिहारमध्ये मतमोजणी उशिराने सुरु झाली. या जुलूम जबरदस्तीला सगळे कंटाळले आहेत. या विरोधात सर्वजण एकत्र येतील आणि पुन्हा या जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाहीत, याची खात्री आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.