Breaking News

लोकसभा निवडणुकीआधी मला पंतप्रधानपदाची ऑफर, पण…; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. विरोधी पक्षातीली एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मला कोणत्याही पदाचा मोह नाहीये, असं म्हणत मी ती ऑफर नाकारली, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूरमधील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आहे. गडकरींचं हे विधान सध्या चर्चेत आहे.

नागपूरमधील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याला नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली होती. तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर तुम्हाला आमचं समर्थन असेल. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का देत आहात? आणि मी तुमचं समर्थन का घेऊ? मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान होणं हे माझं ध्येय कधीच नव्हतं. मी पूर्णपणे झोकून देऊन माझं काम करतो. माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे, असं नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणाले.

मी त्या नेत्याला म्हटलं की मी माझ्या विचारधारेशी प्रामाणिक आहे. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे. माझ्या पक्षाने मला ते सगळं दिलं, ज्याबद्दल मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यामुळे असा कोणत्याच प्रस्तावाला मी बळी पडत नाही. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही. मी माझ्या विचारधारेवर चालत राहील, असं म्हणत गडकरींनी राजकारणातील आणि पत्रकारितेतील नैतिकतेच्या मुद्द्यावर जोर दिला.

नितीन गडकरी यांनी स्वातंत्र्य मूल्यांवर भाष्य केलं. ईमानदारीने विरोध करणाऱ्या लोकांचा सन्मान केला पाहिजे. न्यायव्यवस्था, कार्यपालिका, विधिमंडळ आणि प्रसारमाध्यमे हे चारही स्तंभ नैतिकतेच्या आधारावर काम करतील तेव्हाच लोकशाही यशस्वी होऊ शकते, असं नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणाले. नितीन गडकरी यांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. 2023-24 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अनिलकुमार यांना देण्यात आला.