भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळविण्याचा चंग बांधला आहे. भाजपने यावेळी ‘अब की बार ४०० पार’, असा नारा दिला आहे. मात्र या घोषणेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेवंत रेड्डी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला जर ४०० हून अधिक जागा मिळवायच्या असतील तर शेजारच्या बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही त्यांना निवडणूक लढवावी लागेल, असा टोला रेवंत रेड्डी यांनी लगावला.

रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, दक्षिण भारतातील राज्यात लोकसभेच्या १३० जागा आहेत. त्यापैकी भाजपला १५ हून कमी जागांवर विजय मिळेल. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस व सहयोगी पक्षांनी राज्यात चांगले प्रदर्शन केले होते. भाजपचे केरळमध्ये खूपच खराब प्रदर्शन होते. आताही डावी आघाडी व काँग्रेसमध्येच सामना होत आहे. तेलंगाणाबाबत रेड्डींनी म्हटले की, इंडिया आघाडी राज्यातील १७ पैकी १४ जागांवर विजय मिळवेल. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस आणि भाजपावर मात करत ११९ जागांपैकी ६४ जागांवर विजय मिळवला होता. बीआरएसला केवळ ३९ जागा मिळाल्या होत्या.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दावा केला की, इंडिया आघाडी दक्षिण भारतात एकूण १३० जागांपैकी ११५ ते १२० जागांवर विजयी होईल. संपूर्ण दक्षिण भारतात भाजपला अधिकाधिक १२-१५ जागा मिळतील. अन्य सर्व जागा इंडिया आघाडीच्या खात्यात जातील. तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, केरळमधील सर्व २० जागांवर इंडिया आघाडीचा विजय होईल. केरळमध्ये भाजप आपले डिपॉझिटही वाचवू शकणार नाही.