अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारीबहाद्दर म्हटल्यानंतर मनसे नेत्यांनी मिटकरी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. इतकंच नाही तर अकोल्यात मिटकरी यांची गाडी देखील मनसे कार्यकर्त्यांनी फोडली. या आंदोलनात सहभागी असणारा जय मालोकार याचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र मिटकरी आणि मनसेमध्ये सुरू असलेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. काल पुण्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना मनसे नेते आशिष साबळे यांनी अमोल मिटकरी जेव्हा पुण्यात येतील तेव्हा त्यांना चोपणार आहोत, मनसे स्टाईल त्यांचा सत्कार करणार असा थेट इशारा दिला होता. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांना चोपण्याची भाषा करणाऱ्या मनसे नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
पुण्यामध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमोल मिटकरी आले की चोपून काढू, कपडे फाडून मारु, तुमच्या बापाचं राज्य नाही. पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रमध्ये असेल कायद्याच्या बापाचं राज्य आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही जर कपडे काढून जो मारण्याची भाषा करत असाल, तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे याल तेव्हा तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही. एवढी ताकद आम्ही ठेवतो, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी मनसे नेत्यांना ताकीद दिली.