kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं असतं पण…’, मालेगावच्या सभेत अमित शाह कडाडले, शरद पवारांवर हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदाह हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकारासाठी काय केलं? असा सवाल यावेळी अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केलं? मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.

लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञानचा नारा दिला. सहकाराच्या माध्यमातून चालवलं गेलं तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो. शेतकरी परंपरागत शेती करतो, अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे. पाण्याची पीए मात्रा किती आहे याचा अभ्यास देखील याठिकाणी केला जातो आहे. 1500 गिर गाई आहेत, त्यातून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील. यामुळे ऑरगॅनिक शेतीची सुरुवात देखील होईल. ऑरगॅनिक लॅबोरेटरी सुरू करा, भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजीराव यांना सांगितलं आहे.

सहकार मंत्रालयाने ऑरगॅनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे. आत्म निर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे. त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे. या संस्थेत 1 लाखांहून अधिक सदस्य आहेत इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे. 80 टक्के शेती इथे ड्रीपद्वारे होते, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.