kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

KBC16 : अमिताभ बच्चन यांनी आपल्याला टेनिस स्टार नोवाक जोकोविच आवडत असल्याचे सांगून न्यूयॉर्कमध्ये त्याच्याशी झालेल्या भेटीचा गंमतीदार सांगितला किस्सा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट
अमिताभ बच्चन समोर असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी. प्रेमस्वरूप हे SSB चे निवृत्त जनरल
अधिकारी असून KBC मध्ये येण्याचे त्यांचे पूर्वीपासूनचे स्वप्न होते.


प्रेमस्वरूप स्वतः टेनिसपटू असून टेनिस त्यांचा आवडता खेळ आहे. श्री. बच्चन यांच्याशी बोलताना त्यांनी
आपले टेनिस-प्रेम व्यक्त करत हे देखील सांगितले की त्यांना एकदा टेनिस टूर्नामेंटमध्ये प्रेक्षक म्हणून
जाण्याची संधी मिळाली होती. त्यावर हसून श्री. अमिताभ बच्चन म्हणाले, “मला नोवाक जोकोविच फार
आवडतो. त्याचा खेळ अप्रतिम आहे आणि तो इतर खेळाडूंची नक्कलही छान करतो.”


संभाषणाच्या ओघात, श्री. बच्चन यांनी आपल्या न्यूयॉर्क दौऱ्याचा एक गंमतीदार पण अविस्मरणीय
किस्सा सांगितला. ते न्यूयॉर्कला टेनिस टूर्नामेंट बघायला गेले होते. ते म्हणाले, “मी तिकडे काही
भारतीयांसमवेत बसलो होतो. त्या लोकांनी मला ओळखले आणि ते माझ्याकडे स्वाक्षरी मागू लागले. पण,
त्यानंतर जे झाले, ते फार आश्चर्यकारक होते! जवळच बसलेल्या दोन अमेरिकन महिलांनी काही वेळ
माझ्याकडे पाहिले आणि त्या म्हणाल्या, “तुम्हाला भेटून आनंद वाटला, विजय अमृतराज.”


बिग बी हसत हसत पुढे म्हणाले, “त्यांना वाटले होते की मी माजी भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज
आहे. कारण एक तर मी भारतीय आहे आणि आमची उंची तशी सारखीच आहे. आणि जर लोकांनी मला
गराडा घातला असेल, तर मी कुणी प्रसिद्ध टेनिस स्टार असलो पाहिजे. मी हसून त्यांना उत्तर दिले की,
“मी कुणी टेनिसपटू नाही. मी फक्त इथे मॅच बघायला आलो आहे. मी खरा कोण आहे, हे काही मी
त्यांना सांगितले नाही.”
हा गंमतीदार किस्सा ऐकून स्पर्धक प्रेमस्वरूप आणि उपस्थित प्रेक्षकांचेही खूप मनोरंजन झाले. मात्र या

किश्शातून श्री. बच्चन यांची विनम्रता आणि अशा परिस्थितीत चमकलेली त्यांची विनोदबुद्धी पुन्हा एकदा
दिसून आली.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत असे हलके-फुलके, गंमतीदार क्षण अनुभवण्यासाठी अवश्य बघा, कौन बनेगा
करोडपती 16 दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!